1 Adorable deity Shri Sant Sewalal Maharaj
अनंत पैलूंचे क्रांतिकारी संत श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
1 Adorable deity Shri Sant Sewalal Maharaj : संत, तत्वज्ञ, योद्धा, व्यापारी, भविष्यवेत्ता, समाजधुरीण, संघटक अशा कितीतरी गुणांचा संगम संत यांच्याठायी पाहायला मिळतो.
अनंत पैलूंचे क्रांतिकारी संत : श्री संत सेवालाल महाराज
गोर बंजारा ही भारतातील आदिम भटकी जमात असून ती अनार्य लोकगणातील मातृपुजक जमात आहे. बुद्ध,चार्वाक,महावीरांच्या भौतिक तत्त्वज्ञानाची एक लढाऊ परंपरा तीत आढळून येते. ही परंपरा तपसू, भिल्लक, लख्खीशाह बंजारा, सेवादास या महापुरुषांनी अधिक समृध्द केली. पैकी बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून संत सेवालाल महाराज यांची ओळख आहे.
संत सेवालाल महाराज हे केवळ संत नव्हते तर थोर समाज सुधारक, लोकसंघटक, राजकारणी, अर्थतज्ञ आणि युद्धशास्त्रात पारंगत असणारे शूर वीर लढवय्ये होते. परंतु त्यांचा इतिहास इथल्या बोरू बहाद्दरांनी लिहिला नाही. जे काही थोडे बहुत संदर्भ मिळतात ते मुस्लीम इतिहासकारांच्या इतिहासातच. बाकी सगळा भर गोर बंजार्यांच्या मौखिक साहित्यावर आहे. (Shri Sant Sewalal Maharaj)
संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 साली डोडी तांडा, ता.गुठ्ठी, जि.अनंतपुर आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांच्या आईचे नाव धरमणी तर वडिलांचे नाव भीमा होते. 52 तांड्याचे प्रमुख म्हणून त्यांना भीमा नायक असे संबोधले जात. भीमा नायक त्याकाळातील मोठे व्यापारी होते. बैलाच्या पाठीवरून मालाची ने-आण करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. घरातून वडिलांचा व्यापारी वारसा संत सेवालाल महाराज यांना होताच, परंतु केवळ तेवढ्यावर न थांबता त्यांनी तत्कालीन राजकारणात,समाजकारणात आणि अर्थाविश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. (Shri Sant Sewalal Maharaj)
अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एकत्र आणले. स्वतःची सरंक्षण फौज उभारली. उत्तरेपासून तर दक्षिणेतल्या सर्व राज्यांच्या राजकारणावर ते बारीक लक्ष ठेवून होते. इंग्रजांना व्यापारी म्हणून भारतात पाय रोवण्यासाठी सगळ्यात मोठा अडसर बंजाऱ्यांची व्यापारी पध्दती ठरत होती. म्हणून इंग्रजांनी सर्व राजांवर बंजार्यांचे व्यापारी नियम मोडीत काढण्यासाठी दबाव आणायला सुरवात केली. त्याविरोधात संत सेवालाल महाराज यांनी बंड पुकारले.
हैद्राबादचा निजाम त्या दबावाला बळी पडत असल्याचे पाहून संत सेवालाल महाराज यांनी त्यावर हल्ला चढवला. या युद्धात निजाम पराभूत झाला आणि त्याने संत सेवालाल महाराज सर्व अटी मान्य केल्या. तिथून निजामाचा खलिता घेऊन ते दिल्लीचा बादशहा गुलाम खान यांच्या दरबारात गेले. गुलाम खान मोठा घमंडी नवाब होता. त्याने संत सेवालाल महाराज यांचा प्रस्ताव नाकारला आणि त्यांचा भरल्या दरबारात अपमान केला. तेव्हा त्यांनी लगेच आपल्या निवडक नऊशे सैनिकांसह गुलाम खानवर हल्ला चढवला. बादशहाच्या 25000 सैन्याला केवळ 900 सैन्याने सळो कि पळो करून सोडले यावरून ते युद्धकलेत किती निष्णात होते हे लक्षात येते. शेवटी दिल्लीचे तख्तही त्यांच्यासमोर झुकले आणि नवाब गुलाम खानने शरणांगती पत्कारत त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. (Shri Sant Sewalal Maharaj)
दिल्लीचे तख्त हलवणाऱ्या संत सेवालाल महाराज यांनी भारतातील कित्येक छोट्या मोठ्या संस्थानिकांना हरवणे फार कठीण नव्हते. पण युद्ध आणि सत्ता हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते. शोषणरहित, अन्यायरहित समाजव्यवस्था हे त्यांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाच्या आड येणाऱ्यांची मात्र ते अजिबात गय करत नव्हते. हे त्यांनी राजस्थानातील लोकांची लुट करणाऱ्या, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या भूमियाचा शिरच्छेद करून सिद्ध केले. अहिंसा आणि शांततापूर्ण सहजीवनाचे ते पुरस्कर्ते होते. पण टोकाची अहिंसा ही देखील एकप्रकारची हिंसाच असते हे ते जाणून होते. म्हणून वेळ-काळ-परिस्थिती आणि गरज पाहून त्यांनी हातात शस्त्रे घेतली. (Shri Sant Sewalal Maharaj)
संत सेवालाल महाराज मऱ्यामा याडीचे भक्त होते. परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. ते सर्व प्रकारच्या धार्मिक कर्मकांडा विरोधात होते. बहुतांश बंजारा समाज हा अशिक्षित अडाणी होता त्यामुळे तो सहजपणे वेगवेगळ्या अंधश्रद्धेला बळी पडत. त्यातून समाजाला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं. त्यासाठी समाजाला उपदेश केला. त्याला गोर बोलीत लडी असे म्हणतात. ‘केणी भजो मत पूजो मत’ (कुणाला भजू नका, पुजू नका), ‘ जानजो छानजो पच मानजो (कुठलीही गोष्ट आधी जाणून घ्या. बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या आणि स्वीकारार्ह वाटली तरच स्वीकारा) अशी विवेकवादी शिकवण त्यांनी दिली. (Shri Sant Sewalal Maharaj)
कुणी गोर गरिबांची छळवणूक करू नये म्हणून ‘गोर गरीबेन डांडण खाहे,सात पिढी नार्केमा जाहे’ अशी भीती घातली. ‘करीहे चोरी खाहे कोरी, हाथेमाई आहे हातकडी पगेमाही बेडी’ चोरी केल्यानंतर हाता पायात बेड्या पडतात आणि तुरुंगवास भोगावा लागतो. म्हणून कुणी त्या वाटेने जाऊ नका अशी शिकवण ते देतात. अशा कितीतरी लडीमंधून त्यांनी समाज सुधारणेचा मार्ग त्यांनी दाखवला. वैश्विक मानवतावादाची शिकवण दिली.
पण आपल्याकडे असामान्य कर्तुत्व असणाऱ्या महापुरुषांचं दैवतीकरण करण्याची थोर परंपरा असल्याने आणि त्यात अलीकडे ब्राम्हणवादाचा संसर्ग झाल्याने संत सेवालाल महाराज यांना अवतारी घोषित करण्यात आले आणि त्यांच्याभोवती अनेक चमत्कार गुंफण्यात आले. त्यांच्या लडीत अनेक पाठभेदही घुसडण्यात आले. मग एकदा का अवतारी घोषित केले कि त्यांचे कर्तुत्व शून्य होते. त्यांच्या हातून जे जे असामान्य घडते त्यामागे दैवी शक्ती असते अशी धारणा बनते. तत्कालीन समाजावर संत सेवालाल महाराज यांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यांचा मृत्यू नेमका का आणि कसा झाला यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. पण संत तुकारामांसारखे सेवालाल महाराजांना देखील जिवंतपणीच स्वर्गात धाडून त्यावर भाकडकथा रचण्यात आलेली आहे. त्यामागचे खरे वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे. (Shri Sant Sewalal Maharaj)
संत सेवालाल महाराज हे अनंत पैलूंचे संत होते !
संत, तत्वज्ञ, योद्धा, व्यापारी, भविष्यवेत्ता, समाजधुरीण, संघटक अशा कितीतरी गुणांचा संगम त्यांच्याठायी पाहायला मिळतो. ‘जे छाती करीय वोन साथ दियुं, हाय नाकीय वोरो डेरो पाडीयु’ असे म्हणत संघर्शील माणसाच्या सोबत राहण्याचे आणि गुलामी करणाऱ्याचे डेरे पाडण्याचे वचन देणारे संत सेवालाल हे बुध्द-चार्वाक-चक्रधर- बसवेश्वर-तुकाराम-फुले –शाहू-आंबेडकर या वैचारिक परंपरेतले आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
जय सेवालाल !
पोस्ट : प्रा.डॉ.सुदाम राठोड
(Shri Sant Sewalal Maharaj)
लोणार : श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार, महाप्रसाद वाटप यासह अन्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकल बंजारा समाजासह मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विविध ठिकाणी पूजन करण्यात आले. तद्नंतर श्री संत सेवालाल महाराज की जय असा जयघोष करत कार्यक्रमांना प्रारंभ झाला. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकीत तरुणांनी उच्चशिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्य बंजारा समाज बांधवांच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज मंदीरा पासुन भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. (Shri Sant Sewalal Maharaj)
शहरातील प्रमुख मार्गावरुन ढोलताश्याच्या गजरात व श्री संत सेवालाल महाराज यांच्या भक्तीगीताने सारा परीसर भक्तीमय झाला होता. यावेळी चौकाचौकात मान्यवरानी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करुन हारअर्पण केले. यावेळी सामाजीक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी , माजी नगराध्यक्ष भुषण मापारी, नगरसेवक संतोष मापारी , आबेदखान, रमजान गवळी, शे.रऊफ , काँग्रेस कमीटीचे माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे, जंगलसींग राठोड, संजय राठोड, जगन राठोड, अरुण जावळे यांच्या सह अनेक मान्यवर आणि विविध पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीतीत होते. (Shri Sant Sewalal Maharaj)
संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
(Shri Sant Sewalal Maharaj)
सोलापूर : श्री संत सेवालाल महाराज मध्यवर्ती मिरवणूक समितीच्या वतीने बंजारा समाजाचे दैवत
संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. बंजारा समाजाचे पारंपरिक लोकनृत्य आणि वाद्यासह निघालेल्या मिरवणुकीने लक्ष वेधले. या मिरवणुकीत पोलिसांनी घालून दिलेले आवाज मर्यादेचे सर्व नियम पाळण्यात आले होते. बंजारा समाजाने मध्यवर्तीची एकच मिरवणूक काढून आदर्श घालून दिला. प्रारंभी मध्यवर्तीच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार, माजी आमदार दिलीप माने, बंजारा समाजाचे माजी आमदार देवानंद चव्हाण, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगणुरे, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा समाजाच्या प्रथेनुसार भोग घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर या मिरवणुकीला प्रारंभ झाला. (Shri Sant Sewalal Maharaj)
बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. युवक युवती यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद लुटला. संत सेवालाल महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला. ही मिरवणूक सात रस्ता येथून निघून शासकीय विश्रामगृह, पत्रकार भवन, संभाजी तलाव, विजापूर नाका मार्गे नेहरूनगर या ठिकाणी विसर्जित झाली. (Shri Sant Sewalal Maharaj)
या मिरवणुकीत मध्यवर्तीचे प्रवर्तक युवराज राठोड, उत्सवा अध्यक्ष युवराज चव्हाण, डीएम ग्रुपचे युवराज चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, कविता चव्हाण, सचिन चव्हाण, विजय राठोड, नाम पवार, श्रीमंत पवार, सरपंच प्रेम राठोड, प्रेमचंद राठोड, नवनाथ जाधव, अजय चव्हाण, अविनाश पवार, विकास चव्हाण, सतीश राठोड, शिवाजी राठोड यांच्यासह बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.