1 Breaking Elections -राजकीय नेत्यांची फिल्डिंग
आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग ...
Elections : आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने नेते त्यांची स्वतंत्र यंत्रणा कामाला लावताना दिसत आहेत.
Elections : गणेशोत्सवात राजकीय नेत्यांची फिल्डिंग…..
आरतीपासून महाप्रसादापर्यंतच्या कार्यक्रमांची घेतली जातेय जबाबदारी
सचिन गोलेच्छा, टीम लोणार न्यूज. www.lonarnews.com
आगामी निवडणुकांचे वारे गेल्या एका महिन्यापासून लोणार तालुक्यात घोंघावताना दिसणे सुरु झाले आहे. त्यात गणेशोत्सव आल्याने त्याकाळात राजकीय बांधणीला मोठ्या नेत्यांसह त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील जबाबदार नेते कार्यरत झाले आहेत. पालिकेत गट शाबूत ठेवणारे इच्छुकही त्यात सक्रिय झाले आहेत. उत्सव सुरू असल्याने आरतीपासून महाप्रसादापर्यंतच्या कार्यक्रमांची जबाबदारी राजकीय नेते उचलत असल्याची चर्चा होत असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरु केल्याचे दिसत आहे.
आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या आखाड्यात राजकारणाची गणिते बेरीज-वजाबाकीच्या शह-काटशह होतच असतात. त्यामुळे नेते त्यांची स्वतंत्र यंत्रणा कामाला लावताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांत खळबळ आहे, तीही आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न दिसताहेत. त्यामुळे तो ज्वर उत्सव काळत तीव्र होतो आहे. अधिकाअधिक नेत्यांचे
प्रतिनिधी अधिक गतीने कामाला लागले आहेत. चौकाचौकांतील मंडळांत नेत्यांचे प्रतिनिधी दिसत आहेत. लोकाभिमुख होण्याची एकही संधी कोणीही गमावताना दिसत नाहीत. त्यामुळे मंडळांच्या वेगवेगळ्या पूजनासह त्यांच्या राजकीय टचच्या चर्चा गाजताहेत. (Elections)
शहरातील गल्ल्या, ग्रामीण भागातील गावे आपल्या बाजूने राहावीत यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांकडून चांगलीच कंबर कसली गेल्याने त्यांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. कोण कोठे असणार, यापेक्षा शहरातील उत्साही युवकांचे वातावरण आपल्याला फायद्याचे होणार याचा अभ्यास सुरू स्थानिक नेत्यांकडून होतांना दिसतोय. त्यामुळे साऱ्यांच्या हालचालीना वेग आल्याचे दिसते. नेत्यांसह पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता गणेशोत्सवात स्वतः झटताना दिसतो आहे. त्यामुळे राजकारणाचे सप्तरंग गणेशोत्सवात अधिकाधिक रंगतदार होतील. सध्या निवडणुकीचे वारे असल्याने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला महत्त्व आले आहे. त्यामुळे शहरातील आजी-माजी नगरसवेकही सक्रिय दिसत आहेत. ते मंडळांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. (Elections)
मंडळांच्या कार्यकर्त्यांना शहाणे व्हा, असा शासकीय बैठकीत समजवण्याचा सूर आवळणारे आता त्याच बैठकांत मंडळांच्या बाजू मांडताना दिसत आहेत. गणेशोत्सवात युवकांचा जल्लोष असतो, तर प्रशासनाची बंधनेही असतात. त्यात त्यांच्यासोबत आहोत, असे दाखवून कार्यकर्ता खिशात कसा घेता येईल, यासाठी स्थानिक नेते रणनीती बनवत आहेत. उत्सव काळातील प्रत्येक मुव्हमेंटचा इव्हेंट कॅच करण्यासाठी प्रत्येक नेते त्याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे येत्या उत्सव काळात वाढणारी राजकीय स्पर्धा ही प्रत्येक गणेशभक्तांपेक्षाही अधिक ताकदीची ठरणार आहे.
उत्सव काळातील आरती, वर्गणीही महत्त्वाची…..
कोणत्या गणेश मंडळाचे सामाजिक योगदान आहे, तेथे कोणते मंडळ गेमचेंजर ठरू शकते, कोणते मंडळ वजनदार आहे, कोणत्या मंडळाचे कार्यकर्ते जास्त आहेत, भागनिहाय मानाचा गणपती कोणता आहे, त्याची यादी तयार केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव राजकीयदृष्ट्या कॅच करण्याची तयारी दिसत आहे. उत्सव काळातील आरती, वर्गणीही महत्त्वाच्या ठरल्या आहेत. महाप्रसादापर्यंतचा सगळा भार तर चक्क नेत्यांनीच पेलल्याचे अनेक ठिकाणी बोलल्या जात आहे. फक्त त्याची जबाबादारी दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या खांद्यावर आहे. (Elections)
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात बाजी मारण्यासाठी विद्यमान आमदार यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागल्याचे सण-उत्सवाच्या निमित्ताने दिसून येत आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी यांनी जनसंपर्क वाढवला असून भेटीगाठी मुळे राजकीय चर्चांना पेव फुटले आहे.