Breaking – 2023-2024 – कार्यालयाची कामगिरी
नाविण्यपूर्ण उपक्रमाची व उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार प्रदान केला .....

2023-2024 : डॉ. निधी पाण्डेय यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
2023-2024 : ‘ कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब’ उपक्रमाची राज्यस्तरावर दखल
अमरावती, दि. 21 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा 2023-2024 मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये ‘कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे’ या उपक्रमाबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांना मुंबई येथे करण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार डॉ. निधी पाण्डेय यांना प्रदान करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाने वर्ष 2023-2024 मध्ये अमरावती विभागातील नागरिकांची महसूल विभागाशी निगडीत कामे तसेच प्रशासकीय कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करुन लोकाभिमूख प्रशासन होण्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करण्यात आला. या नाविण्यपूर्ण उपक्रमाची व उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार प्रदान केला आहे. स्मृतीचिन्ह व चार लक्ष रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (2023-2024)
लोकसभा सर्वसाधारण निवडणूक 2024 यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात असल्यामुळे ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024’ यावर्षाची पारितोषिके जाहीर करता आली नव्हती. उक्त पारितोषिके ही यावर्षीच्या (2024-2025) पुरस्कारांसोबत जाहीर करण्यात आली. स्पर्धेत राज्यभरातून शासकीय विभाग, कार्यालये आणि अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट प्रशासकीय कार्य आणि उपक्रम सादर केले. राज्यस्तरीय निवड समितीने प्रस्तावांचे मूल्यांकन करून पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड केली आहे. पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.
‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी विभागीय आयुक्तांचा सन्मान
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान
नागपूर, दि.21 : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना वर्ष 2023-2024 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्काराने गौरविण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-2025 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार प्रदान करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यावेळी उपस्थित होत्या. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध प्रकारच्या 12 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी ‘ई-पंचनामा ॲप’ तयार करण्यात येऊन डीबीटीद्वारे थेट मदत देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत वेळेत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या संकल्पनेतून ‘ई पंचनामा ॲप’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. डिसेंबर 2022 मध्ये ॲप तयार करण्यास सुरवात झाली आणि एप्रिल 2023 मध्ये ॲप तयार झाले. यापूर्वी पंचनामे करायला दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागायचा या ॲपमुळे पंचनामे सात दिवसात व्हायला लागले. मे आणि जून 2023 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार, तलाठी यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर नागपूर विभागात या ॲपद्वारे पंचनामे करण्यात आले. ॲपद्वारे पंचनाम्याचा देशातील पहिलाच प्रयोग नागपूर विभागात यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ई पंचनामा ॲपचा उपयोग करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 या दोन वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान” राबविण्यात आले. यात सहभागी होवून या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका, नागपूर, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसिलदार यांना वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सतत सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. राज्यातीला सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे व राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद पोलीस यांच्या पत्नीस थेट पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश दिल्याने त्यांची शहीदांप्रति असलेली संवेदनशीलता दिसून आली आहे, अशी भावना श्रीमती पवार यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानताना व्यक्त केली. श्रीमती पवार म्हणाल्या, ‘माझ्या पती प्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी दिली आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि देशाच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान दिलेल्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.’ (2023-2024)