महाराष्ट्रराष्ट्रीयस्थानिक बातम्या
1 Breaking Water levels झपाट्याने वाढ
लोणार सरोवरातील वाढती जलपातळी : निसर्गचक्र की मानवनिर्मित हस्तक्षेप?

Water : लोणार सरोवरातील वाढती जलपातळी ही निसर्गाचा इशारा मानायचा की व्यवस्थापनातील त्रुटींचा परिणाम, हा प्रश्न आज केंद्रस्थानी आहे.
Water : लोणार सरोवरातील वाढती जलपातळी : निसर्गचक्र की मानवनिर्मित हस्तक्षेप?
किशोर मापारी, लोणार, जि. बुलढाणा.
लोणार : जगातील मोजक्या उल्कापाताने निर्माण झालेल्या सरोवरांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जलपातळीत सध्या झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ केवळ पावसाळी निसर्गचक्राचा भाग आहे की त्यामागे मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे, याबाबत अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ आणि प्रशासन यांच्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे की नाही ही माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. दरम्यान ही बाब वाऱ्यासारखी पसरल्याने पर्यटक तसेच देशभरातून नागरिकांचा कल लोणार सरोवर पाहण्यासाठी वाढला असल्याची माहिती लोणार सरोवर परिसरात वाढलेल्या गर्दीवरून दिसत आहे.यंदा लोणार परिसरात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. सरोवराच्या सभोवतालच्या उतारांवरून वाहून येणारे पाणी, जमिनीखालून होणारी झिरपण आणि लहान नाले यामुळे सरोवराच्या जलसाठ्यात लक्षणीय भर पडत आहे. सरोवर बंदिस्त असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी जलपातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जात आहे. Water
मात्र केवळ पाऊस हे एकमेव कारण नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही वर्षांत परिसरातील भूजल पातळीत बदल झाला असून, शेतकी पाण्याच्या वापरातील बदल, विहिरी व बोअरवेलमधून होणारे पाणी उपसणे आणि नंतर तेच पाणी परत सरोवराच्या दिशेने वाहून जाणे, यामुळे जलसंतुलन बिघडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अनेकांचे मत वेगवेगळी आहेत.लोणार सरोवर परिसरात झालेली अनियंत्रित बांधकामे, रस्ते, तसेच पर्यटनवाढीमुळे निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी हे घटक दीर्घकालीन दृष्टीने सरोवराच्या परिसंस्थेवर परिणाम करत आहेत. नैसर्गिक पाणी शोषण करणारी माती व वनस्पती कमी झाल्याने पावसाचे पाणी थेट सरोवरात जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही चिंतेची बाब आहे.
लोणार सरोवरातील वाढती जलपातळी ही निसर्गाचा इशारा मानायचा की व्यवस्थापनातील त्रुटींचा परिणाम, हा प्रश्न आज केंद्रस्थानी आहे. जागतिक वारसा असलेल्या या अद्वितीय सरोवराचे संवर्धन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, स्थानिक सहभाग आणि कठोर प्रशासनिक निर्णय यांची सांगड घालणे आता अपरिहार्य झाले आहे.
जैवविविधतेवर होऊ शकणारा प्रभाव
लोणार सरोवराची ओळख त्याच्या क्षारीय आणि खारट पाण्यासाठी आहे. जलपातळी वाढल्यास क्षारांचे प्रमाण बदलू शकते, ज्याचा थेट परिणाम सूक्ष्मजीव, शेवाळे आणि पक्षीजीवनावर होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या रंगात होणारे बदल हे याचे द्योतक मानले जातात.
प्रशासनाची भूमिका आणि आव्हाने
प्रशासनाकडून लोणार सरोवर मधील जलपातळीवर लक्ष ठेवले जात असले तरी, दीर्घकालीन याबाबत नियोजनाचा अभाव जाणवतो. तज्ज्ञांचे मत आहे की, केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता जलवाहिन्यांचा अभ्यास, भूजल प्रवाहांचे नकाशीकरण आणि मानवी हस्तक्षेपावर नियंत्रण आवश्यक आहे. Water




