2024 Breaking : Crater : सेल्फी पुरत्याच भेटी !
बैठकांमधील चर्चेत अडकला लोणार सरोवराचा विकास ..
Crater : जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर चे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने गेल्या दहा वर्षात अनेक बैठका झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री तसेच अनेक राजकीय पुढारी लोणार सरोवरला भेटी देऊन गेले. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यांच्या भेटी हया सेल्फी पुरत्याच मर्यादित राहिल्याच्या सध्याच्या एकंदरित परिस्थिती वरून दिसतेय.
Crater : लोणार सरोवर विकास आराखडा एक मृगजळ !
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. www.lonarnews.com
लोणार : राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे जगप्रसिध्द लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी विशेष कृती आराखडय़ाअंतर्गत कोटय़वधींचा निधी उपलब्ध करून दिला असताना या आराखडय़ातील एकही काम उपयुक्त व फायदेशीर झाले नसून यातील बहुतांश कामे तांत्रिकदृष्टय़ा सदोष व अपूर्ण असल्याचे दिसते. तरीही आराखडय़ाचा कागदोपत्रीच गाजावाजा करून पाठ थोपटून घेण्याचा अवास्तव प्रकार शासकीय यंत्रणांचा सुरु असल्याने लोणार सरोवर विकास आराखडा एक मृगजळ ठरत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (Crater)
लोणार सरोवर हे निसर्गनिर्मित खाऱ्या पाण्याचे सरोवर असून सरोवराच्या सभोवती असंख्य दुर्मिळ वृक्षांनी नटलेले अभयारण्य आहे. शासन आणि प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता या जागतिक व राष्ट्रीय दर्जाच्या ठेव्याचे जतन आणि संवर्धनासाठी सरोवरप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक याचिका दाखल केलेली आहे. यावर उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने या सरोवराची पाहणी करून त्याआधारे उच्च न्यायालयाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने शासनाची कानउघाडणी करून लोणार सरोवर जतन व संवर्धनासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ११ ऑक्टोबर २०१० रोजी बैठक घेऊन यासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हा आराखडा तयार करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०१० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तत्कालीन आमदार, तत्कालीन लोणार नगराध्यक्ष यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण ११ प्रमुख मुद्द्यांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा कृती आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक मंजुरी देण्यात आली. (Crater)
लोणारमधील सांडपाणी मुख्य सरोवरात जाऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना, नबीचा बंधारा दुरुस्ती व सांडपाणी प्रक्रिया उभारण्याबाबत ठोस उपाययोजना, जमीन भूसंपादन, सरोवर परिसरात मानवी हस्तक्षेप बंद व्हावा म्हणून सरोवरास लोखंडी साखळी कुंपण बांधणे, परिसरातील पिसाळ बाभळीचे कायमस्वरूपी निर्मूलन, सरोवर परिसरातील प्रदूषण थांबविण्यासाठी सरोवरापासून जाणारा मंठा रोड बंद करून लोणार-मंठा वळणमार्ग तयार करणे, सरोवराची सुरक्षा करण्यासाठी वनविभागाची आवश्यक ती पदनिर्मिती व रिक्त पदे भरणे, प्राचीन मंदिरासोबतच इतर मंदिरे पुरातत्व विभागाकडे सोपविणे व त्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना, इजेक्टा ब्लॅकेटच्या संरक्षणाबाबत उपाययोजना, सरोवरातील पाण्याची आयसोटोप चाचणी तसेच
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी योजना या मुद्यांसह जवळच्याच अंबर तलावाचे सुशोभिकरण करणे, महसुली जमिनीवर संपूर्ण सोयीसुविधांयुक्त उद्यान निर्मिती, पर्यटकांसाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालय बांधणे, नागपूरच्या धर्तीवर रमण विज्ञान केंद्रासारखा सायन्य पार्क उभारणे, मुंबईच्या नेहरू तारांगणाप्रमाणे लोणार तारांगण व त्यात जगातील विविध विवरांची माहिती देण्याकरिता चलचित्र चित्रपटगृहाची निर्मिती, पर्यटकांसाठी पार्किंग व्यवस्था, बसस्थानकावर पर्यटकांसाठी स्वागतकक्ष, साहित्य ठेवण्यासाठी लॉकर्स, शौचालय, स्नानगृह आदि सुविधा, लोणार येथे एसटी महामंडळाचा स्वतंत्र डेपो सुरू करणे, अजिंठा-वेरूळच्या धर्तीवर दरवर्षी लोणार महोत्सव घेणे व जागतिक ठेव्याचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला होता. (Crater)
या आराखडय़ानंतर पहिल्या ११ मुद्यांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करून दिली. त्यात या परिसराला तारेचे साखळी कुंपण, सांडपाण्याची विल्हेवाट, नबी बंधाऱ्याच्या सुधारणा, पिसाळ बाभळीचे निर्मूलन ही व अन्य महत्त्वपूर्ण कामे होती. लोणार जतन व संवर्धन आराखडय़ाच्या अंमलबजावणीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केल्यास कोटय़वधी रुपयांच्या खर्चित निधीतून विकासकामे झालीत का? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. (Crater)
लोणार सरोवर विकास आराखडा अंतर्गत खर्च झालेल्या निधीचा एकंदरीत अपव्यय झाल्याचे दिसते. सरोवर परिसरात सुशोभिकरण झालेले नसून पर्यटकांसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
-: भूषण मापारी , माजी नगराध्यक्ष, लोणार नगर परिषद.
(Crater)
* लोणार सरोवर पाहण्येयासाठी येणाऱ्या पर्यटकांना सरोवराची तसेच पुरातन मंदिरांची माहिती देण्यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन असावे तसेच मार्गदर्शक नेमावेत. त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे.
* लोणार सरोवरात उतरण्यासाठी शक्यतो एक किंवा दोन ठिकाणी वाटा असाव्यात. अन्य वाटा बंद कराव्यात, जेणे करून नियंत्रण ठेवता येईल.
* एका वेळी किती पर्यटक लोणार सरोवरात उतरावेत, यावर बंधन असावे तसेच सर्व पर्यटकांची नोंद व्हावी.
* देशभरातील तसेच लोणार आणि परिसरातील नागरिकांमध्ये लोणार सरोवरासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत.
* शाळा, महाविद्यालय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या लोणार दर्शन सहली आयोजित केल्या जाव्यात.