Crop : खरीप पिक सध्या काढणीला आलेले आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Crop : परतीच्या पावसाने खरीप पिकावर संक्रात….
लोणार तालुक्यात सोयाबीनचे नुकसान
Editor : किशोर मापारी, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
लोणार तालुक्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्व भागांत सोयाबीनची काढणी जोरात चालू आहे. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने जोर धरल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन खराब होताना दिसत आहे.
लोणार तालुक्यात दररोज कधी अति जास्त तर कधी काही प्रमाणात सतत पडणाऱ्या पावसामुळे पिके काढताना अडचणी येत असून, नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांकडून केली जात आहे. प्रतिकूल परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून खरीप पिके चांगली जोपासली आहेत. दसरा दिवाळीला काही तरी हाताला लागेल या आशेवर असणारा शेतकरी मात्र या पावसाने पूर्ण खचला असल्याचे चित्र आहे. (Crop)
ऐन काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात अनेक ठिकाणी पाणी जमा झालेले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन खराब होत आहे. सोयाबिन भिजल्याने या भिजलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला खूप मोठा आर्थिक फटका बसला असल्याची माहिती समोर येत आहे.
बळीराजा आर्थिक अडचणीत
मृग नक्षत्रात पेरणी केलेले सर्व खरीप पिक सध्या काढणीला आलेले आहे. मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा विचार शेतकरी करीत असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे जास्तीचे नुकसान झाले आहे. यावर्षी वेळेत पेरण्या झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांमधून आर्थिक उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, परतीच्या पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांची मोठी तारांबळ
लोणार तालुक्यातील बहुतांश सोयाबीन काढणीला आलेले आहे. गेल्या एका आठवड्यापासून या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली होती. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून वावरात ढीग केले होते. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी देखील लावल्या होत्या. मात्र, परतीचा अचानक पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली, तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकात पाणी जमा होऊन सोयाबीन चे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. (Crop)
लग्नसमारंभ पडल्याने अगोदरच खर्च झालेला असल्याने उसनवारी करून सोयाबीन ची पेरणी केली होती. दसरा-दिवाळी पर्यंत सोयाबीनचे पैसे हातात पडतील आणि त्यातून कर्ज फेडून सण साजरा करता येईल अशी आशा होती. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.:- वैभव गाडे, शेतकरी, हिरडव.