2024 Breaking : Lonar Crater : प्रगतीचा आढावा
विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर विकास आराखडा समितीची आढावा बैठक संपन्न ..
Lonar Crater : लोणार सरोवर विकास आराखडा अंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास्तव लोणार येथे अमरावती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
Lonar Crater : लोणार सरोबर विकास आराखडा बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा..
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. www.lonarnews.com
लोणार : विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर विकास आराखडा समितीची आढावा बैठक ७ डिसेंबर २०२४ रोजी लोणार सरोवराच्या काठावरील जुने निसर्ग निर्वाचन केंद्र येथे पार पडली. यावेळी मागील बैठकीत झालेल्या मुद्यांवर चर्चा करून झालेल्या तसेच सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान अध्यक्षांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लोणार सरोवर विकास आराखडा संदर्भातील कामांबाबत निर्देश दिलेत. (Lonar Crater)
लोणार विकास आराखडा समितीच्या बैठक असली की लोणार शहर आणि सरोवर परिसरातील काही ठिकाणी नेहमीप्रमाणे साफसफाई करून नीटनेटकेपणा केला जातो. सदर बैठकीच्या अगोदरच्या दिवशीही अधिकारी व कर्मचारी यात व्यस्त दिसून आले. ७ डिसेंबर २०२४ रोजी लोणार सरोवराच्या काठावरील जुने निसर्ग निर्वाचन केंद्र येथे पार पडलेल्या विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर विकास आराखडा समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, पुरातत्व विभाग, वन्यजीव विभाग, वनविभाग, नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीत नविन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व भुमिगत गटार योजना, पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह बांधकाम करणे, शहरातील पाणी पुरवठा योजना, भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील अन्नछत्र स्थळाजवळील पोच रस्त्याबाबत, लोणार सरोवराभोवती व विवर क्षेत्राबाहेरील वेडी बाभूळ निष्कासीत करणे, क्षेत्रीय कर्मचारी निवासस्थाने दुरुस्ती करणे, वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित झालेले जुने सार्वजनिक बांधकाम विभाग रेस्ट हाऊस दुरुस्ती करणे, वन्यजीव विभागाकडे हस्तांतरीत जुने नगर पालिका कार्यालयाची दुरुस्ती करणे, इजेक्टा ब्लॅकेटच्या सरंक्षणाकरिता खासगी जमिनीचे अधिग्रहण करणे, सरोवराभोवती पर्यटकांकरिता व्हुविंग प्लॅटफार्म तयार करणे व इलेक्ट्रीक व्हेइकल्स खरेदी करणे, लोणार किन्ही रस्ता बायपास करणे, लोणार मंठा रस्ता बायपास करणे, प्रयोगशाळा व पर्यटक माहिती केंद्र, लोणार विज्ञान केंद्र स्थापन करणे, तारांगण व संग्रहालय बांधकाम करणे व स्थापन करणे, भारतीय पुरातत्व विभागाकडील कामे या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. (Lonar Crater)
लोणार सरोवर विकास आराखडा अंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास्तव अमरावती विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष लोणार सरोवर विकास समिती यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट २०२४ रोजी अमरावती विभागीय कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झालेल्या आढावा बैठकीचे इतिवृतावर कार्यान्वित यंत्रणेने सादर केलेल्या अहवालानुसार ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतचे अनुपालन सादर करण्यात आले.
लोणार शहरात नविन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व भुमिगत गटार योजना कामे प्रगती पथावर सुरु आहेत. मात्र दरम्यान काहीच वर्षापूर्वी झालेल्या सिमेंट रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने नागरिकांना वाहने चालविण्यास अडथळा निर्माण होत आहे. तरी सदर सिमेंट रस्त्यांची कामेही तातडीने सुरु करावेत.
नितिन शिंदे, माजी शहराध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,लोणार.