2024 Breaking : RSS शाखेत देशभक्तीचे संस्कार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा माणूस घडवण्याचा कारखाना ! - कृष्णा सपकाळ यांचे प्रतिपादन
RSS : कुंटुंबव्यवस्था हा भारताचा आत्मा आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंब असावे याकडे भर देण्याची गरज आहे. त्यासाठी संघ कुंटुंब प्रबोधनाचे काम करत असल्याचे कृष्णा सपकाळ म्हणाले.
RSS : लोणार नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न….
Written By : सचिन गोलेच्छा, पत्रकार, ता. लोणार, जि. बुलढाणा.
लोणार नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव 13 ऑक्टोबर 2024 च्या सायंकाळी स्थानिक विवेकानंद विद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय विचार मंच जिल्हा संयोजक तथा पत्रकार कृष्णा सपकाळ मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कैलास पारीख तर मंचावर तालुका संघ चालक मंगेश शेटे, नगर संघचालक शंकर हिवरकर उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांची मोठी उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देशभक्तीचे संस्कार होतात. भेदभाव मुक्त आणि समरसता युक्त समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत. समरसतेची पाळेमुळे संघाच्या शाखेतच रोवली जातात, त्यामुळे संघात जात विचारली जात नाही, जात – पात संघ मानत नाही. आम्ही सगळे सहोदर म्हणजे एकाच आईची लेकरे आहोत हा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत होतो. राष्ट्रहितासाठी जगणाऱ्या माणसांना घडवण्याचे काम संघ करतो. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा माणूस घडवण्याचा कारखाना आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय विचार मंच जिल्हा संयोजक तथा पत्रकार कृष्णा सपकाळ यांनी लोणार येथे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव दरम्यान केले. (RSS)
विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव कार्यक्रमादरम्यान पुढे बोलतांना कृष्णा सपकाळ म्हणाले की, शक्ती संपन्न समाजाशिवाय सध्या पर्याय नाही. संघटनेतच ताकद असते. हिंदु समाज जेव्हा जेव्हा जातीपातींमध्ये विखुरला गेला तेव्हा आक्रमकांनी त्याचा फायदा घेतला. हिंदु म्हणून एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले. कुटूंबव्यवस्था हा भारताचा आत्मा आहे, त्यामुळे एकत्रित कुटुंब असावे याकडे भर देण्याची गरज आहे. त्यासाठी संघ कुटुंब प्रबोधनाचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशान, एक गाव एकत्रित पंगत यामाध्यमातून समरस समाज निर्मितीसाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र केवळ एवढ्याने होणार नाही. कामाची आणखी गरज आहे, समाजातल्या सज्जन शक्तीने संघाच्या कामात योगदान द्यावे असे आवाहनही कृष्णा सपकाळ यांनी यावेळी केले. विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवचे प्रमुख अतिथी कैलास पारीख यांनी वाढती व्यसनाधीनता, विभक्त कुटूंबपद्धती यावर चिंता व्यक्त केली. संघ देशभक्तीचे संस्कार करतो. वेगवेगळ्या क्षेत्रात राष्ट्रीय हिताचे काम करतो. असे म्हणत त्यांनी संघाच्या कामाचे कौतुक केले. विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवचे प्रास्ताविक प्रकाश सुपट्यान यांनी केले. विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाच्या आधी लोणार नगरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन निघाले होते. (RSS)