2025 Breaking – 1 May – महाराष्ट्र दिन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..

1 May : भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1 May : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन
- मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ०1 : महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (1 May)
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. (1 May)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निर्धार आणि निश्चय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी, जवान उपस्थित होते. (1 May)
महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “महाराष्ट्राची स्थापना ज्यांच्या बलिदानातून सत्यात आली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राने आपले थोरपण देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान देत सिद्ध केले आहे. महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा ,साहित्य ,सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य हा आपल्या अस्मितेचा आत्मा आहे. ही ओळख जपणे आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.
महाराष्ट्र शुरवीर नरोत्तमांची पावनभूमी आहे. तशीच ती समाजसुधारकांची आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांची आहे. या राज्याला ज्ञान ,वैराग्य, सामर्थ्य, त्याग, प्रतिभा आणि कला या सद्गुणांचे अलौकिक कोंदण लाभले आहे. सामाजिक प्रबोधनाचा लाभलेला वारसा, राज्यात नांदणारी शांतता, कायदा सुव्यवस्था , नैसर्गिक साधनांचा सदुपयोग करण्याचे नियोजन, प्रतिभावंत नागरिक आणि कष्ट करण्याची तयारी असणारी युवा पिढी यामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राने आपली ओळख निर्माण केली आहे. या सगळ्याच्या पाठबळावर आणि सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित, सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा आपला संकल्प आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
कामगार दिनाच्या निमित्तानेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करून, महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात कामगार वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि अधिकार संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही म्हटले आहे.