राजकीय

APMC Prestige 23 : राजकारण नवी रणनीती व आव्हाने

APMC सत्तेसाठी नव्या राजकीय समीकरणांची नांदी !

APMC : महिनाभरापूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची हातमिळवणी पाहायला मिळाली. विदर्भातील राजकीय वर्तुळात होत असलेला हा बदल नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का ? अशा चर्चेला जनमानसात उधाण आल्याचे दिसून येत आहे. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यावर आल्याची परिस्थिती एकदंरीत दिसत आहे.

 

APMC बुलढाणा जिल्ह्यात मात्र काहीशा वेगळा राजकीय संघर्ष दिसून आला. जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर दिसून आला. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे महाराष्ट्रात सरकार असतांना मात्र लोणार येथे भाजप ला  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित विश्वास घेत नसल्याचा सूर दिसून आला. लोणार येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजगी व्यक्ती केल्याचे दिसून आले. मात्र शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधाला फारसे महत्व न देता खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात मेहकर आणि लोणार कृषी बाजार समितीवर झेंडा फडकवला.

APMC APMC बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी आमदार तथा विद्यमान बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवण्यात यश आले. जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला. बुलढाणा कृषी  बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र त्यांना मोठा धक्का बसला.

APMC मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या १५ वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ताब्यात होती. यावेळी भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात ही बाजार समिती भाजपने खेचून आणली. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

APMC राजकीय स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षातील नेते एकत्र येतात आणि त्यातून संधीसाधू युती जन्माला येते. राजकारणात कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व नसते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय महिनाभरापूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये दिसून येतो. या निवडणुकांसाठी विदर्भातील चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस व भाजप युती, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती, तर भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या अहेरीत भाजप व राष्ट्रवादी युती, तसेच अकोला येथील काही APMC कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची हातमिळवणी लक्षवेधी ठरली. ही संधीसाधू युती औटघटकेचीच होती की, नव्या राजकीय समीकरणांची ती नांदी आहे, हे समजणे कठीण झाले आहे. विदर्भातील राजकीय वर्तुळात सत्तेसाठी राजकीय गणित जुळविले जात आहे.

APMC चंद्रपूर आणि राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भाजपसोबत युती केली होती. येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे एकत्र आले. या युतीला आजी-माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद असल्याची दबक्या आवाजात चर्चा होतांना दिसते.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे  सुधीर कोठारी यांच्याशी हातमिळवणी करीत कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेश केला. त्यांनी सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनाही घेतले. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतही काँग्रेस व भाजप युती होती. या दोन्ही युतींमुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे बोलले जाते.

APMCभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी युतीतून बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक लढवली गेली असल्याचे चित्र आहे. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामधील राजकीय वैर कारण असल्याचे बोलले जात आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी या दोन नेत्यांतील वैर काही केल्या जात नाही अशी चर्चा आहे. यामुळेच दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही या दोन नेत्यांमधील राजकीय वैर संपुष्टात येईल, अशी चिन्हे तूर्तास तरी दिसत नाही.

APMC गडचिरोलीच्या अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती मैदानात उतरली होती. राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे माजी मंत्री अम्ब्रीश आत्राम यांनी एकत्र येत, त्यांनी याठिकाणी उमेदवार उभे केले होते. कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आत्राम काका आणि पुतणे सत्तेसाठी म्हणा किंवा स्वहितासाठी सोबत आल्याचे दिसून येते.

अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, बाळापूर व मूर्तिजापूर या  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय (राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गट) नेते एकत्र आले. या प्रमुख राजकीय पक्षांनी जणू ‘हम साथ, साथ है’ चाच संदेश दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. स्थानिक समीकरणे या निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरतात. या निवडणुका शेतकरी हिताच्या असल्याचे ठासून सांगितले जात असले तरी राजकीय सत्ता आणि स्वहितासाठीच या निवडणुकीत व्यूहरचना आखली जाते, हे सर्वश्रुतच आहे. या निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी, एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याची हव्यासा आणि मित्र पक्षांतील नेत्यांशी असलेले वैर, यातून नवे राजकीय डाव खेळले जातात. मात्र एकंदरीत सर्व निरीक्षण केले तर काही संधीसाधू युतींना कुठे यश तर कुठे अपयश आले दिसते.

ही युती या निवडणुकीपुरतीच होती, असे हे काही नेते आता नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यासमोर सांगत आहेत. मात्र आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत यात नक्की काय राजकीय समीकरणे जुळविली जातील हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. यातील बहुतांश निवडणुकादेखील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहून लढवल्या जातात, या पार्श्वभूमीवर ही संधीसाधू युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

एकंदरीत पहिले गेले तर, पक्षाचे दिग्गज नेते आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांशी युती करून स्थानिक निवडणुका लढवत असतील तर या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी  आताच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा अशाच युती आणि आघाड्या आगामी निवडणुकांतही होतील, ही शक्यता नाकारता येणार नाही. तूर्त विदर्भातील बाजार समिती निवडणुकांतील हातमिळवणीचे राजकीय भवितव्य आणि परिणाम, याबाबात विविध तर्क लावले जात आहे.

🔗

APMC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button