Crop Loan : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
Crop Loan यंदा हळदीसाठी 1.26 लाख तर सोयाबीन पिकासाठी घ्या हेक्टरी 59 हजारपर्यंत कर्ज !
वाशिम : खरीप हंगाम 2024 साठी पीककर्ज वाटपाला प्रारंभ झाला आहे. कोणत्या पिकाला किती कर्ज वाटप करावयाचे आहे. याचे दर निश्चित केले जातात. यंदा गतवर्षीचेच दर लागू राहणार आहेत. एक हेक्टर क्षेत्रावर हळदीसाठी 1 लाख 26 हजार तर सोयाबीनसाठी हेक्टरी 59 हजार 400 रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे. तथापि, या रक्कमेत बँकस्तरावर वाढ केली जाते.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्याला 2024-25 मध्ये नव्याने कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळणार आहे. त्यानुसार त्या- त्या बँकेला लक्षांक ठरवून दिला जाणार आहे. 1 एप्रिल पासून पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. पीककर्ज वाटपात सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खासगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँक पीककर्ज वाटपात आघाडीवर असल्याचे दिसून येते. दरवर्षी पीककर्ज वाटपास सुरुवात होण्यापूर्वी पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर निश्चित केले जातात.
तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात आहे. तसेच सार्वजनिक बँकांनी हेक्टरी आणि एकरी पीकनिहाय दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक पेरामध्ये दर्शविलेल्या पिकांनुसार कर्जवाटप केले जात आहे. निश्चित केलेल्या दरामध्ये बँकांकडून 10 टक्के वाढ करुन अधिक रक्कम कर्जस्वरुपात शेतकऱ्यांना उपलब्ध केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
Crop Loan फळपिकांसाठी सर्वाधिक पीककर्ज दर
मध्यवर्ती बँकेच्या वतीने फळपिकांसाठी पीककर्ज दर निश्चित केले आहेत. त्यामध्ये केळी पिकाला हेक्टरी 1 लाख 15 हजार, पपई 84 हजार (हेक्टरी), द्राक्ष 3 लाख 63 हजार 600 (हेक्टरी), डाळींब 1 लाख 45 हजार 200 (हेक्टरी), सिताफळ 58 हजार 600 (हेक्टरी), संत्रा 80 हजार 300 (हेक्टरी), मोसंबी 80 हजार 300 हेक्टरी असे दर आहेत.
Crop Loan बागायती पिकांसाठी किती ?
मध्यवर्ती बँकेकडून बागायती पिकांसाठी निश्चित केलेल्या पीककर्ज दरामध्ये हळदीला हेक्टरी 1 लाख 26 हजार, संकरीत कापूस बागायत 70 हजार हेक्टर, तूर बागायती 48 हजार 400 हेक्टर, ऊस (सर्वसाधारण) पूर्व हंगामी 1 लाख 32 हजार हेक्टर, सुरु 1 लाख 20 हजार हेक्टर, खोडवा 1 लाख 8 हजार हेक्टरी आणि टिश्यूकल्चर ऊस 90 हजार हेक्टरी असे दर आहेत.
जिरायती पिकांसाठी किती?
जिरायती पिकांमध्ये संकरीत कापूस कोरडवाहू 58 हजार प्रति हेक्टरी, तूर कोरडवाहू 41600 (हेक्टर), सोयाबीन 59400 (हेक्टर), मूग 22800 (हेक्टर), उडीद 22800 (हेक्टर), ज्वार 41600 (हेक्टर) याप्रमाणे मध्यवर्ती बँकेने पीककर्ज दर निश्चित केले आहेत. सोयाबीन, कपाशी, हळदीसाठी कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.