2025 Breaking – Shriram – सुवर्णमहोत्सव
श्रीराम अध्यात्म मंदिर शोभायात्रेचा सुवर्णमहोत्सव

Shriram : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील श्री पोद्दारेश्वर राममंदिरात दर्शन घेऊन पूजन केले. श्री पोद्दारेश्वर मंदिर समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.
Shriram : प्रभू श्रीरामांकडून उच्च जीवनमूल्यांची शिकवण -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : प्रभू श्रीरामांनी आपल्याला उच्च जीवनमूल्ये शिकवली व मर्यादांची जाणीव करून दिली. त्यामुळेच सर्वोत्तम राज्य म्हणून आपण रामराज्याचा गौरव करतो. आपल्यातील राम आपण जाणला तर असुरी शक्तींचा विनाश करता येऊ शकतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे आयोजित श्रीराम अध्यात्म मंदिर शोभायात्रेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आमदार विकास ठाकरे, परिणय फुके, श्रीमती अमृता फडणवीस, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार प्रकाश गजभिये, सुधाकर कोहळे, श्रीराम मंदिर समितीचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. (Shriram)
प्रभू श्रीराम हे राष्ट्रपुरुष होते. त्यांनी स्थापन केलेले रामराज्य हे भेदभावविरहित राज्य होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सत्याचा विचार करणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणाऱ्या अशा राज्याची स्थापना करण्याची प्रत्येकाची मनीषा असल्याने आपण प्रभू श्रीरामांची आराधना करतो. त्यांनी सामान्यजनांना एकत्र करून तयार केलेल्या सैन्याने आसुरी शक्तीचा पराभव केला. अशा शक्ती संपवण्यासाठी प्रत्येक वेळी अवतारी पुरुषाची गरज नसते. प्रत्येकाने आपल्यातील राम जाणला तरी आसुरी शक्तींचा विनाश करता येऊ शकतो. (Shriram)
या शोभायात्रेत समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. आपल्या संविधानात प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या प्रतिमा असून महात्मा गांधीजींनी मांडलेल्या रामराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी ते एक महत्त्वाचे साधन असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी यावेळी काढले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणात शोभायात्रेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा केली. या कार्यक्रमात दैनिक लोक वाहिनीचे संपादक प्रवीण महाजन निर्मित शंभर फोटोंच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या संयोजक शिवानी दाणी – वखरे यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते पालखीचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. लक्ष्मी भवन चौक, कॉफी हाऊस, झेंडा चौक, शंकर नगर, बजाज नगर, लक्ष्मी नगर व गांधीनगर मार्गे श्रीराम मंदिरात या रॅलीची सांगता करण्यात आली. (Shriram)
पश्चिम नागपूर संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजू काळेले, शोभायात्रा समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, मंदिराचे पदाधिकारी व भाविक भक्त यावेळी उपस्थित होते. तसेच येथील शिवाजीनगर परिसरातील मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले व पूजन केले.
श्री पोद्दारेश्वर राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूजन
नागपूर : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील श्री पोद्दारेश्वर राममंदिरात दर्शन घेऊन पूजन केले. श्री पोद्दारेश्वर मंदिर समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, डॉ.आशिष देशमुख, कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, डॉ. नितीन राऊत, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, श्री पोद्दारेश्वर राम मंदिराचे विश्वस्त महेंद्र पोद्दार आदी उपस्थित होते. मंदिरात उपस्थित भाविकांना फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात केलेल्या श्रीरामांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.