2025 Breaking – Land Acquisition – साधूग्राम
जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी घेतला कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा

Land Acquisition : भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले
Land Acquisition : साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक, दि. १४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (Land Acquisition)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे. (Land Acquisition)
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, गोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघात, सुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही विविध सूचना केल्या, तर महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.