Pundlikrao Mapari Valor 1 तपोभूमी दुर्गा टेकडी
पुंडलिकराव मापारी यांनी खऱ्या अर्थाने वानप्रस्थ स्वीकारला
Pundlikrao Mapari : उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे वैज्ञानिक, ऐतिहासिक वास्तू, पौराणिक तसेच वनसंपदासाठी जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. सरोवर ला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. परंतु लोणारमध्ये आणखी एक ठिकाण आहे जे प्रसिद्धीपासून दूर आहे. त्या ठिकाणाला बघण्यासारखे रूप देणारा अवलियाही प्रसिद्धीपराङमुख आहे. ते ठिकाण म्हणजे निसर्गरम्य दुर्गा देवीची टेकडी होय. “वृक्षवल्ली आम्हा सोयिरे वनचरे” या तुकाराम महाराजांच्या ओळीवर अखे जीवन ओवाळत, ज्यांनी वन निर्माण केले आणि त्या वनात वानप्रस्थ स्वीकारला असे पुंडलिकराव मापारी यांच्याविषयी जाणून घेऊया.
उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले शहर हि लोणारची ओळख जगाच्या नाकाशावर आहे. शिवाया या सरोवरातील ऐतिहासिक वास्तू, वनसंपदा, वनऔषधी असलेले दुर्मिळ वनस्पती प्रसिद्ध आहे. सरोवर परिसराला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. लोणारला पौराणिक महत्त्वही आहे. परंतु लोणारमध्ये आणखी एक ठिकाण आहे जे प्रसिद्धीपासून दूर आहे. त्या ठिकाणाला बघण्यासारखे रूप देणारा अवलियाही प्रसिद्धीपराङमुख आहे. ते ठिकाण म्हणजे निसर्गरम्य दुर्गा देवीची टेकडी होय. “वृक्षवल्ली आम्हा सोयिरे वनचरे” या तुकाराम महाराजांच्या ओळीवर अखे जीवन ओवाळत, ज्यांनी वन निर्माण केले आणि त्या वनात वानप्रस्थ स्वीकारला असे पुंडलिकराव मापारी Pundlikrao Mapari यांच्याविषयी अनेकांना काही जास्त माहिती नाही. याबाबत सांगायचे झाले तर त्यांनी स्वत:ला प्रसिद्धी पासून नेहमीच दूर ठेवले.
जगप्रसिद्ध लोणार सरोवारापासून किमान १ किलोमीटर अंतरावर आणि लोणार ते रिसोड मार्गावर भर उन्हाळ्यातही हिरवा शालू पांघरलेली निसर्गरम्य दुर्गा देवीची टेकडी मनमोहून घेते. असे सांगितले जाते कि, साधारण ४० वर्षापूर्वी ही टेकडी अगदी उजाड होती, उदास होती. या टेकडीवर सुरुवातीला दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. दुर्गा देवीची पूजा अर्चना करण्यासाठी भाविकांची टेकडी वर हळूहळू गर्दी वाढली. यामुळे नंतर या टेकडीला दुर्गा देवीची टेकडी म्हणून ओळखले जाऊ लागले.
दरम्यान, एकेकाळी लोणारच्याच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणावर भारी पकड असणाऱ्या आणि अनेक राजकीय समीकरण जुळवून आणणाऱ्या लोणार येथील पुंडलिकराव मापारी Pundlikrao Mapari यांनी या उजाड टेकडीला हिरवीगार करण्याचा विडा उचलला. साधारणपणे ३५ वर्षापूर्वी लोणार शहरातील पुंडलिकराव मापारी ह्या नामांकित व्यक्तीची पाऊले दुर्गा देवीच्या टेकडीकडे वळले.
Pundlikrao Mapari पुंडलिकराव मापारी यांनी स्वतःच्या शेतातून स्वःखर्चातून पाणी आणून दुर्गा देवीच्या टेकडीवर खेळविले. हजारोच्या संख्येने टेकडीच्या चहुबांजूनी रोपटे लावली, जतन केली आणि जोपासली. रोपटे लावणे तसे पाहिले तर सोपे काम आहे. दरवर्षी हजारो वृक्षांची रोप लावली जातात, फोटो काढले जातात आणि पुन्हा त्याच खड्यामध्ये दुसऱ्या वर्षीही वृक्षांची रोप लावली जातात. मात्र अवघड काम आहे ते त्यांचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे. पुंडलिकराव मापारी यांनी वृक्षांच्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यावर भर दिला. हे योगदान फार मोठे आहे. पण त्याहून अधिक त्यांनी मोठा त्याग केला तो म्हणजे समाजकारण आणि राजकारणात मोठे वजन असतांना त्यांनी ह्या सगळ्या संसारिक जीवनाचा त्याग केला. समाजात आणि पंचक्रोशीत असलेला आपला मानमरातब सोडला आणि कायमस्वरूपी दुर्गा देवीच्या टेकडीवर राहिले.
एवढेच काय तर घर सोडले, नातेवाईक सोडले आणि या दुर्गा देवीच्या टेकडीवर झाडाच्या सानिध्यात येऊन ते राहिले तेही कायमचेच. पुन्हा त्यांनी घराचे तोंडही पाहिले नाही. सर्व प्रकारच्या सणसंमारंभाचा त्याग केला. दुर्गा देवीच्या टेकडीवर लावलेल्या वृक्षांसाठी त्यांनी जीवन अर्पण करून टाकले. खऱ्या अर्थाने पुंडलिकराव मापारी Pundlikrao Mapari यांनी वानप्रस्थ स्वीकारला. रामायण काळापासून अनेक राजेलोकांनी मोठ मोठ्या ऋषींनी वानप्रस्थ स्वीकारल्याचे आपल्याला माहित आहे. त्यांनी घराचा त्याग केला आणि वनाचा रस्ता धरला, वनात गेले. पण पुंडलिकराव मापारी असे एक अवलिया आहे, ज्यांनी वन निर्माण केले आणि त्या वनात वानप्रस्थ स्वीकारला.
दुर्गा देवीच्या टेकडीवर गेल्यावर अगदी प्रथमदर्शनी एक पाटी दिसते. त्या पाटीवर संत तुकाराम महाराज यांचा अंभग आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयिरे वनचरे”. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग अक्षरशः प्रत्यक्षात उतरवणारे पुंडलिकराव मापारी यांचा सारखा दुसरा व्यक्ती सापडणे नाही. “वृक्षांनाही तुमच्या सारखा जगण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे” हेही त्यांनी तिथे लिहिले आहे. ते लिहावे लागावे ही एक शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
Pundlikrao Mapari पुंडलिकराव मापारी यांनी दुर्गा देवीच्या टेकडीवर असलेला निरव एकांत आणि तेथील शांतता प्रयत्नपूर्वक जपली आहे. मानवी प्रवृत्ती अशी आहे कि, मानव जिथे गेला तिथे तो पर्यावरण व निसर्गाचा विध्वंस करतो.
Pundlikrao Mapari पुंडलिकराव मापारी यांनी जर दुर्गा देवीच्या टेकडीवर लोकांना मुक्त वावरण्याची संधी दिली असती तर इथेही इस्ततः प्लास्टिक, कचरा दिसायला लागला असता. पण त्यांनी हे होऊ दिले नाही. प्रसंगी लोकांना इथे जेवणावरही बंदी घातली. त्यांचे हे नियम काहींना जाचक वाटले. मात्र त्यामुळे टेकडी वरील वनराई मधील पवित्र शांतता टिकली आहे.
मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी भाषेवर प्रभृत्व असणाऱ्या पुंडलिकराव मापारी Pundlikrao Mapari यांचे वय अंदाजे ८५ वर्ष असेल.
दुर्गा देवीची टेकडी एक तपोभूमीच !
Pundlikrao Mapari पुंडलिकराव मापारी यांच्या निवा-याकरिता दुर्गा देवीच्या टेकडीवर एक खोली असून खोलीत जीवनाश्यक अत्यंत मोजक्याच वस्तू आहेत. त्यांनी गरजा कमी ठेवत निर्सगरम्य वातारणात राहण्यास पसंती दिली. योगसाधनेवर त्यांचा अधिक भर राहिला. पूर्वी ऋषीमुनी वर्षानुवर्षे तपाचरण करायचे आणि त्यातून मोक्ष प्राप्ती आणि ब्रह्मज्ञान मिळवायचे. ऋषीमुनी बारा वर्षे तप करायचे त्याला एक ‘तप’ म्हटले जायचे. पुंडलिकराव मापारी यांनी तर अशी तीन तपे खर्ची घालून दुर्गा देवीच्या टेकडीवर नंदनवन उभे केले आहे. हजारो वृक्ष डौलात उभे आहेत. कधीकाळी ही टेकडी उजाड होती, यावर विश्वास न बसावा इतकी वनराई इथे उभी केली. हेच त्यांच्या तपाचे फळ म्हणता येईल.
निसर्गरम्य दुर्गा देवीच्या टेकडी ची वनसंपदा धोक्यात !
तीन तपे खर्ची घालून तयार केलेल्या वनसंपदेला सिंमेटच्या जंगलाचा आता गराडा पडला आहे. दुर्गा देवीच्या टेकडीच्या भोवती शासकीय कार्यालय, तारांगण, रिसोर्ट आणण्याचे घाट घातले जात आहेत. लोणारचा तथाकथीत विकास टेकडीच्या भोवती घिरटया घालत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुंडलिकराव मापारी यांनी संपूर्ण जीवन अर्पण करून जोपासलेली वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.