Breaking 1 – Diesel Shortage-शेती अडचणीत
यांत्रिकीकरणावर पूर्ण अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट
2026 Diesel Shortage : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक ; याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होण्याची शक्यता आहे.
Diesel Shortage : खरीप तोंडावर, डिझेल टंचाईने शेती अडचणीत
Diesel : यांत्रिकीकरणावर पूर्ण अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट
– किशोर मापारी, एडीटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
खरीप हंगामाची चाहूल लागली असतानाच ग्रामीण सह शहरी भागात डिझेलच्या टंचाईने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पहिल्या सरींची प्रतीक्षा करत शेतकरी मशागतीच्या तयारीत असताना डिझेल उपलब्ध नसल्याने नांगरणी, पेरणी आणि सिंचनाची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, यंदाच्या खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

काही वर्षांत शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, डिझेल पंप यांसारख्या साधनांचा वापर सर्वत्र वाढला आहे. मात्र, या सर्व यंत्रांसाठी डिझेल हा कणा ठरतो. सध्या अनेक ठिकाणी पेट्रोलपंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत असून, काही ठिकाणी डिझेलचा साठा संपल्याने पंप बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे वेळेवर मशागत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. (Diesel Shortage)
पूर्वी बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची कामे केली जात होती. मात्र, काळाच्या ओघात पशुधन कमी झाले आणि यांत्रिकीकरण वाढले. आज बहुसंख्य शेतकरी पूर्णपणे यंत्रांवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत डिझेल टंचाईमुळे पर्यायच उरलेला नाही. “बैलजोडी असती तर शेती थांबली नसती, पण आता मशीन असूनही काम करता येत नाही,” अशी खंत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.

खरीप हंगामात वेळेवर पेरणी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. पावसाच्या आगमनानंतर काही दिवसांतच मशागत व पेरणीची कामे पूर्ण करावी लागतात. मात्र, डिझेल अभावी या कामांना विलंब होत असल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादन घटून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डिझेल पुरवठा अपुरा असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी डिझेल मर्यादित प्रमाणात दिले जात असून, काळाबाजाराच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतीसाठी स्वतंत्र डिझेल कोटा निश्चित करावा, ग्रामीण भागात पुरवठा सुरळीत करावा आणि दर नियंत्रणात ठेवावेत.
डॉ. भास्करराव मापारी, मा.अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, बुलढाणा.
Diesel Shortage : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होण्याची शक्यता आहे.



